चालू घडामोडी // Current AFFAIRS in Marathi [Chalu Ghadamodi January 2020 BY ESTUDYCIRCLE
खनिज कायदा दुरुस्ती अध्यादेशाला मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाने कोळसा खाणींच्या लिलावाचे नियम सुलभ करण्यासाठी खनिज कायदा (दुरुस्ती) अध्यादेश 2020 ला मंजुरी दिली आहे. या अध्यादेशाच्या माध्यमातून माईन्स अँड मिनरल्स (डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशरन) ऍक्ट 1957 तसेच कोल माईन्स (स्पेशल प्रोव्हिजन्स) ऍक्ट 2015 मध्ये दुरुस्ती केली जाणार आहे.
कोळशासह अन्य क्षेत्रातील 46 खाणींचा भाडेकरार 31 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. अध्यादेशाद्वारे 31 मार्चपूर्वी या खाणींचा लिलाव करणे शक्य होणार आहे. नव्या कंपनीला भाडेकरार सहजपणे हस्तांतरित व्हावा आणि उत्पादन सुरूच रहावे याची खबरदारी बाळगली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नीलांचल इस्पात निगम लिमिटेडमधील (एनआयएनएल) 100 टक्के हिस्सेदारी विकण्यास मंजुरी दिली आहे.\
दिल्ली विधानसभा निवणुकीची घोषणा
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी येत्या 8 पेबुवारीला मतदान होणार असून मतगणना 11 फेब्रुवारीला होत आहे. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सुनिल अरोरा यांनी सोमवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही घोषणा होताक्षणीच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सध्या या राज्यात आम आदमी पक्षाचे राज्य आहे.
सध्याच्या विधानसभेचा कालावधी 22 फेब्रुवारीपर्यंत आहे. या कालावधीआधी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. आयोगाच्या घोषणेचे प्रमुख राजकीय पक्षांनी स्वागत केले असून निवडणूक योग्य वातावरणात पार पडावी अशी अपेक्षा व्यक्त केली
‘वन नेशन-वन रेशनकार्ड’ कर्नाटकसह 12 राज्यात लागू
केंद्र सरकारने बुधवारीपासून ‘वन नेशन वन रेशनकार्ड’च्या अंमलबजावणी प्रारंभ केला. या योजनेमुळे रोजगार व व्यवसायानिमित्त अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात 12 राज्यांमध्ये याची अंमलबजावणी होईल. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, राजस्थान, केरळ, झारखंड, मध्यप्रदेश आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. जून महिन्यापर्यंत देशातील सर्व राज्यांमध्ये याची अंमलबजावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
12 राज्यांमधील सरकार लवकरच एक स्वरूप असणारे रेशनकार्ड जारी करेल. त्यामुळे रोजगार व व्यवसायानिमित्त अन्य राज्यात वास्तव्यास असणाऱया नागरिकांना रेशनकार्डच्या माध्यमातून मिळणारे धान्य वाटपाससह अन्य लाभ मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1 जानेवारीपासून 12 राज्यांमध्ये तर जून महिन्यापर्यंत संपूर्ण देशभरात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’च्या अंमलबजावणीचा सरकारचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले. सद्यस्थितीत देशातील 79 कोटी नागरिकांकडे रेशनकार्ड आहे.
पहिल्या टप्प्यात 35 कोटी नागरिकांना होणार लाभ
12 राज्यातील 35 कोटी नागरिकांना ‘वन नेशन वन रेशनकार्ड’चा लाभ मिळणार आहे. निम्मे उत्पन्न गटातील नागरिकांना याचा सर्वाधिक लाभ होईल. सर्व रेशनकार्ड हे आधार कार्डची जोडलेले आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी संगणकीकरणावर केंद्र सरकार 880 कोटी रुपये खर्च करणार आहे. लवकरच सरकार सर्व राज्यांसाठी एकाच स्वरूपाचे रेशनकार्ड जारी करणार असल्याची माहिती 3 डिसेंबर 2019 रोजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेमध्ये दिली होती.
गोल्डन ग्लोब पुरस्कारः जेकिन फीनिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता, रिनी जेलवेगर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरात गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी पार पडला आहे. या सोहळय़ात ‘1917’ या चित्रपटाचीच सर्वाधिक चर्चा राहिली आहे. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले आहे. तर ‘जोकर’ चित्रपटाने दोन पुरस्कार प्राप्त करत गोल्डन ग्लोबमध्ये इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच एखाद्या कॉमिक बुक चित्रपटाने दोन पुरस्कार पटकाविले आहेत.
जोकिन फीनिक्स यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. जोकरमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली होती. जोकर चित्रपटातील अभिनयासाठी जोकिन यांना आता अत्यंत प्रतिष्ठेचा ऑस्कर मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अमेरिकन गायिका तसेच अभिनेत्री जूडी गारलँडचे पात्र साकारणारी अभिनेत्री रिनी जेलवेगर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
‘रॉकेटमॅन’च्या ‘आय ऍम गॉना लव्ह मी अगेन’ला सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार मिळाला आहे. ‘फ्रोजन 2’ आणि ‘द लायन किंग’ यासारख्या मोठय़ा चित्रपटांना मागे टाकून यंदा सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपटाचा पुरस्कार ‘मिसिंग लिंक’ने पटकाविला आहे.
‘वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड’करता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ब्रॅड पिटला मिळाला आहे. टॉम हँक्स, अल पचीनो आणि जो पेस्की यासारख्या दिग्गज अभिनेत्यांना ब्रॅड पिट यांनी मागे टाकले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक क्वँटिन टॅरेंटीनो यांना सर्वोत्कृष्ट स्क्रीप्लेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
म्युझिकल-कॉमेडी श्रेणीत यंदा क्वँटिन टॅरेंटीनो याच्या ‘वन्स अपॉन ए टाईम’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडले गेले आहे. याच शेणीत ‘रॉकेटमॅन’साठी टेरॉन ईगर्टन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर याच शेणी अंतर्गत ऑक्वाफीना यांची ‘फेयरवेल’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झाली आहे. टेलिव्हिजन सीरिजच्या म्युझिकल आणि कॉमेडी शेणीत फोब वॉलर ब्रिज यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळविला आहे. फोब यांना हा पुरस्कार ‘फ्लीबॅग’साठी मिळाला आहे. प्रियांका चोप्राने या सोहळय़ात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
श्रेणी विजेता
बेस्ट मोशन फिचर……… 1917
सर्वोत्कृष्ट अभिनेता…….. जोकिन फीनिक्स
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. रीनी जेलवेगर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक……… सॅम मेंडिस (1917)
म्युझिकल कॉमेडी शेणी
सर्वोत्कृष्ट चित्रपट………. वन्स अपॉन द टाईम…
टीव्ही सीरिज अभिनेता.. रॅमी युसूफ
लीमिटेड सीरिज आणि मोशन पिक्चर
सर्वोत्कृष्ट अभिनेता…….. रसेल क्रो
सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज.. सक्सेशन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. फोब वॉलर ब्रिज
सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट पॅरासाइट (द. कोरिया)
सर्वोत्कृष्ट गीत………….. आय ऍम गॉना…
सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपट… मिसिंग लिंक
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ब्रॅड पिट
मोशन पिक्चर
ओरिजिनल स्कोर……………..हिल्डर गुडनाडोटिर
सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज………….चेर्नोबिल
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. पॅट्रिशिया आर्केट
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री……लॉरा डर्न
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्टॅलन स्कार्सगार्ड
ऑस्ट्रेलियात वणवा, 50 कोटी प्राण्यांचा मृत्यू
ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमधील आग आता अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. या आगीने 20 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. याचबरोबर सुमारे 50 कोटी प्राणी तसेच पक्ष्यांना या वणव्यामुळे स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या या आगीच्या संकटाने ऑस्ट्रेलियात हाहाकार उडविला आहे.
या संकटादरम्यान हृदयाला पिळवटून टाकणारे एक छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या छायाचित्रात कांगारूचे पिल्लू जळालेल्या स्थितीत कुंपणाच्या तारेला चिकटलेले दिसून येते. आगीपासून बचावाकरता पळत असताना कांगारूचे पिल्लू तारेत अडकून पडले. तारेत अडकल्याने हे पिल्लू जळून खाक झाले आहे. ही घटना दर्शविणारे छायाचित्र अत्यंत विचलित करणारे आहे. हे छायाचित्र पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
जंगलातील आगीमुळे आतापर्यंत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. 4 महिने उलटून देखील ऑस्ट्रेलियातील वणवा अधिकच भडकत चालला आहे. आतापर्यंत 50 कोटी प्राण्यांचा मृत्यू आगीत होरपळल्यामुळे झाला आहे. या प्राण्यांमध्ये कांगारू, पक्षी आणि सरपटणाऱया जीवांचा समावेश असल्याचा अनुमान युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या पर्यावरणतज्ञाने व्यक्त केला आहे.
आगीत अडकलेल्या प्राण्यांना वाचविण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. पण किती प्राणी अद्याप जिवंत आहेत हेच अद्याप समजू शकलेले नाही. ऑस्ट्रेलियातील सुमारे 15 दशलक्ष एकर क्षेत्रातील जंगल जळून खाक झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया प्रांतांमधील वणवा पाहता आणीबाणी घोषित करत मार्गांवरील वाहतूक रोखली आहे. स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना तेथून बाहेर काढले जत आहे. व्हिक्टोरिया, न्यू साउथ वेल्स आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया प्रांतांमध्ये वेगवान वाऱयामुळे शनिवारी आग आणखीनच पसरली आहे. या प्रांतांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. पश्चिम सिडनीच्या पेनरिथमध्ये 48.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सोलेमान ठार
बगदाद विमानतळावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात इराणच्या कद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सोलेमानचाही मृत्यू झाला असल्याची माहिती इराकी सुरक्षा अधिकाऱयाने दिली आहे. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता. याचा बदला म्हणूनच अमेरिकेने हा हवाई हल्ला केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी इराकमध्ये झालेल्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला असे संबोधले आहे. यात ठार झालेल्यांमध्ये अबू महदी अल मुहादिस याचा समावेश असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. मुहादिस तेहरान समर्थक इराकी सशस्त्र समुहातील शिया नेटवर्क हश्द अल शाबीचा दुसऱया क्रमांकाचा प्रमुख आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच इराणवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते
ब्रिक्स परिषदेचे एका वर्षासाठीचे अध्यक्षपद यंदा रशियाला
ब्रिक्स परिषदेचे एका वर्षासाठीचे अध्यक्षपद यंदा रशियाला मिळाले आहे. याबद्दल चीनने समाधान व्यक्त केले असून रशिया-चीन भागिदारी जगाच्यादृष्टीने लाभदायक असल्याचे प्रतिपादन केले आहे. रशियाने ब्रिक्सच्या सर्व देशांमध्ये योग्य समन्वय घडवून आणून संघटना बळकट करावी आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावावा, अशी अपेक्षाही चीनने व्यक्त केली आहे.
आपल्या अध्यक्षपदाच्या काळात रशिया 150 विविध योजनांच्या माध्यमातून ब्रिक्स देशांमध्ये एकोपा आणि समन्वय आणण्याचा प्रयत्न करणार आहे. रशियातील सेंट पीट्सबर्ग येथे आगामी ब्रिक्स शिखर परिषद जुलैमध्ये होणार आहे. ब्रिक्सचे प्रमुख पाच देश याच ठिकाणी स्वतंत्ररीत्या बैठक करणार आहेत. जी-20 शिखर समिटही सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे नोव्हेंबरमध्ये होत आहे.
हॉलंड नव्हे आता केवळ नेदरलँड्स
2020 ला प्रारंभ होताच उत्तर युरोपमधील एक देश स्वतःचे दुसरे नाव त्यागणार आहे. सरकार याकरता रीब्रँडिंग मोहीम चालवत आहे. नव्या वर्षात स्वतःचे दुसरे नाव (निकनेम) ‘हॉलंड’ अधिकृतपणे संपुष्टात आणणार असल्याची घोषणा नेदरलँडने केली आहे. तेथील कंपन्या, दूतावास, मंत्रालय आणि विद्यापीठांमध्ये 1 जानेवारीपासून देशाला केवळ ‘नेदरलँड्स’ म्हणून ओळखले जाणार आहे.
प्रत्यक्षात हॉलंड हा नेदरलँड्समधील छोटा भाग आहे. नेदरलँड्सच्या 12 प्रांतांपैकी केवळ 2 प्रांतांच्या नावांमध्ये हॉलंडचा अंतर्भाव होते. पण बहुतांशवेळा लोकांकडून नेदरलँड्सला हॉलंड असेच संबोधिले जाते. ऍमस्टरडॅम, रॉटरडॅम आणि द हेग या तीन प्रमुख शहरांसाठी हा देश ओळखला जातो.
पहिले हायपरसोनिक क्षेपणास्त्र रशियाच्या सैन्यात सामील
रशियाने ध्वनिच्या वेगापेक्षा 27 पट अधिक वेगवान अवनगार्ड हायपरसोनिक क्षेपणास्त्र सैन्यात सामील केले आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा करताना क्षेपणास्त्र आण्विक क्षमतेने युक्त असल्याचे सांगितले आहे. या क्षेपणास्त्राच्या वेगामुळे कुठलीच यंत्रणा त्याच्यापासून बचाव करू शकत नाही.
संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांच्यानुसार 27 डिसेंबर रोजी स्थानिक प्रमाणवेळेनुसार 10 वाजता क्षेपणास्त्र सैन्यात सामील करण्यात आले आहे.
हायपरसोनिक क्षेपणास्त्र ध्वनिच्या वेगापेक्षा (1235 किमी प्रतितास) किमान 5 पट अधिक वेगाने उड्डाण करू शकते. हायपरसोनिक क्षेपणास्त्र क्रूज आणि बॅलेस्टिक या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. हे क्षेपणास्त्र डागण्यात आल्यावर पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडल्यानंतर जमिनीवरील किंवा हवेतील लक्ष्य भेदू शकते. हे क्षेपणास्त्र रोखणे अत्यंत अवघड असते. तसेच वेग अधिक असल्याने रडार सुगावा लावू शकत नाही.
अवनगार्ड क्षेपणास्त्राचा वेग
हे क्षेपणास्त्र ध्वनिच्या वेगापेक्षा 27 पट अधिक असेल. या क्षेपणास्त्राचा वेग 33 हजार किमी प्रतितासापर्यंत पोहोचू शकतो. हे जगातील पहिले हायपरसोनिक क्षेपणास्त्र असल्याचा दावा रशियाने केला आहे.
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी
महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम रोमहर्षक लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने निर्णायक क्षणी पटाची पकड घेऊन मिळवलेल्या दोन गुणामुळे त्याने लातूरच्या शैलेश शेळकेला तीन विरुद्ध दोन गुणांनी नमवीत. महाराष्ट्र केसरी किताबाची गदेला गवसणी घातली. नाशिकला पहिल्यांदा ही मानाची गदा मिळाल्याने नाशिकच्या कुस्ती शौकिनांनी जल्लोष केला. तर काका पवारांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात मंगळवारी मानाची गदा विराजमान झाली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा यांच्या संयुक्त विद्यमाने 63 व्या महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार, यांच्या हस्ते बरोबर वाजता खा. श्रीनिवास पाटील, खा. श्रीरंग बारणे, माजी खा. अशोकराव मोहोळ, आ. भारत भालके, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या उपस्थितीत सहा वाजून पस्तीस मिनीटानी लावण्यात आली.
97 किलोच्या अंतिम फेरीत सोलापूरच्या सुरज मुलाणीची सातारच्या विकास सुळ पुढे डाळ शिजली नाही. मोठय़ा फरकाने ही लढत जिंकून सुवर्णपदक खिशात टाकले. सुरजला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. 97 किलो मातीगटात सौरभ सोनटक्के मुंबई उपनगर विरुद्ध विशाल बनकर सोलापूर याने चितपटीने विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले.
दरम्यान सकाळच्या सत्रात माती गट 65 किलो, 61 किलो गादी गट, 74 किलो गादी गट, 65 किलो गादी गट, 92 किलो गादी गट, महाराष्ट्र केसरी गादी गट यांचे अंतिम सामने रंगले.
61 किलो गादी गट- सुवर्ण- विजय पाटील, कोल्हापूर (4-2), रौप्य – सागर बरडे, नाशिक जिल्हा, कांस्य- अनुदान चव्हाण, पुणे शहर, कांस्य- सौरभ पाटील, कोल्हापूर शहर
74 किलो गादी गटा सुवर्ण- कुमार शेलार, कोल्हापूर, रौप्य- स्वप्निल काशीद, सोलापूर शहर, कांस्य- अमित सुळ, सोलापूर, कांस्य- राकेश तांबूटकर, कोल्हापूर.
65 किलो गादी गटा सुवर्ण – अक्षय हिरगुड, कोल्हापूर, रौप्य – देवानंद पवार, लातूर, कांस्य – भालचंद्र कुंभार, पुणे शहर, कांस्य – भाऊराव सदगिर, नाशिक.
92 किलो गादी गट ा सुवर्ण – पृथ्वीराज पाटील, कोल्हापूर, रौप्य – प्रसाद सस्ते, पिंपरी चिंचवड, कांस्य – भैरव माने, सोलापूर, कांस्य – सागर मोहोळ, पुणे शहर.
65 किलो गादी गटा सुवर्ण – सुरज कोकाटे, कोल्हापूर (10-0), रौप्य – सोपान माळी, जळगाव, कांस्य – हदयनाथ पाचवटे, कोलहपूर विरुद्ध लखण म्हात्रे, कल्याण (3-1).
महाराष्ट्र केसरी गादी गट : सुवर्ण – हर्षवर्धन सदगिर, नाशिक जिल्हा, रौप्य – अभिजित कटके, पुणे शहर, कांस्य – संतोष गायकवाड, अहमदनगर , कांस्य – योगेश पवार, सोलापूर शहर
९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलना
उस्मानाबादमध्ये होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा अरूणा ढेरे, विक्रम काळे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले. सायंकाळी झालेल्या उद्घाटन सोहळ्यास संमेलानाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे व्हिलचेअरवरूनच दाखल झाले.
गुरुवारी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो उस्मानाबादेत आले होते. संत गोरोबा काका साहित्य नगरी उस्मानाबाद मध्ये आल्यावर संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची प्रकृती अत्यावस्थ झाली होती. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. अशातच शुक्रवारच्या ग्रंथदिंडीतही संमेलनाध्यक्ष सहभागी झाले नव्हते. मात्र उद्घाटनाच्या सोहळ्यात संमेलनाध्यक्ष हे व्हीलचेअरवरून व्यासपीठावर आलेले आहेत.
भारतीय पारपत्राला 84 वे स्थान
2020 मधील जगाच्या सर्वात सामर्थ्यशाली पारपत्रांच्या यादीत भारतीय पारपत्राचे स्थान दोन अंकांनी घसरून 84 वर पोहोचले आहे. भारतीय पारपत्रधारकाला 58 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळू शकतो, असे एका अहवालातून समोर आले आहे. सामर्थ्यशाली पारपत्राच्या यादीत जपान पहिल्या स्थानावर असून पाकिस्तान अखेरच्या 4 देशांमध्ये सामील आहे.
इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) च्या आकडेवारीनुसार हेनले अँड पार्टनर्सने पारपत्र निर्देशांक प्रसिद्ध केला आहे. यात पारपत्रधारकाला किती देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळतो, या निकषावर मानांकन देण्यात आले आहे. सामर्थ्यशाली पारपत्राच्या यादीत जपान पहिल्या स्थानावर कायम आहे. जपानच्या पारपत्रासह 191 देशांचा व्हिसामुक्त प्रवास करता येतो.
भारताचे मानांकन
हेनले पारपत्र निर्देशांक 2020 च्या अहवालानुसार यंदा भारतीय पारपत्राच्या मानांकनात 2 अंकांची घसरण झाली आहे. मागील वर्षाच्या 82 च्या तुलनेत यंदा 84 वे स्थान मिळाले आहे. याचबरोबर मॉरिटेनिया आणि तजाकिस्तानही 84 व्या स्थानावर आहेत. भारताच्या तुलनेत चीनचे पारपत्र अधिक सामर्थ्यशाली असून त्याला 71 वे स्थान मिळाले आहे. अफगाणिस्तानचे पारपत्र यादीत तळाला आहे.
व्हिसामुक्त प्रवास
भारतीय पारपत्रधारक भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, मकाऊ, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, केनिया, मॉरिशस, सेशेल्स, झिम्बाम्बे, युगांडा, इराण तसेच कतारसह 58 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात. पण काही देशांमध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हलची गरज भासते.
आसाममधील माजुली बेट 2040 पर्यंत होणार नष्ट
आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या पुरामुळे माजुली बेटाचा अधिकाधिक भाग पाण्याखाली जात आहे, त्यामुळे भविष्यात या बेटावर स्थलांतर करण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही, परिणामी हे बेट नष्ट होईल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
तज्ञांच्या मतानुसार, माजुली बेटावर अंदाजे 1 लाख 70 हजार लोक राहतात. दरवर्षी मान्सूनमध्ये पर्जन्यमान अधिक असल्याने या बेटाचा अधिकाधिक भाग पाण्याखाली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना स्थलांतरीत व्हावे लागते. पुरामुळे या बेटाचा अधिकाधिक भाग दीर्घकाळ पाण्याखाली जात आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. तर बेटावरील जमीन नापीक होत आहे. पाऊस आल्यावर बेटावर राहणारे मिशिंग आदिवासी लोक आपल्या जनावरांना घेऊन उंचावरील भागात स्थलांतरीत होतात. मात्र, येत्या काळात स्थलांतरीत होण्यासाठी त्यांना जागाच शिल्लक राहणार नाही. मागील 12 वर्षात या बेटावरुन 10 हजार कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
सध्या हे बेट नष्ट होण्याच्या मार्गावर असून, ते 2040 पर्यंत पूर्णपणे नष्ट होईल, असेही तज्ञांनी म्हटले आहे.
ऑकलंड टेनिस स्पर्धेत सेरेना विजेती
अमेरिकेची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू सेरेना विलीयम्सना जेतेपदाचा दुष्काळ तब्बल तीन वर्षांनंतर संपुष्टात आला. रविवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील ऑकलंड खुल्या महिलांच्या क्लासिक टेनिस स्पर्धेचे जेतेपद सेरेना विलीयम्सने आपल्याच देशाच्या बिगर मानांकित पेगुलाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियातील भीषण वणव्यात बळी पडलेल्यासाठी सेरेनाने आपली बक्षिसांची रक्कम मदत म्हणून जाहीर केली.
दहाव्या मानांकित सेरेना विलीयम्सने रविवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पेगुलाचा 6-3, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. 2017 साली मेलबोर्न येथील डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धा यापूर्वी सेरेनाने जिंकली होती. सेरेनाने या जेतेपदाबरोबरच 43,000 अमेरिकन डॉलर्सचे रोख बक्षीस पटकाविले. दरम्यान ऑस्ट्रेलियातील वणव्यात बळी पडलेल्या व्यक्तीसाठी सेरेनाने या स्पर्धेतील रोख रकमेचे बक्षीस मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. किमान 20 वर्षे आपण ऑस्ट्रेलियात टेनिस खेळत असल्याने ऑस्ट्रेलियातील या नैसर्गिक दुर्घटनेबद्दल आपल्याला तीव्र दुख होत असल्याचे सेरेनाने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातील जंगली परिसराला लागलेल्या भीषण आगीत अनेक जनावरे तसेच व्यक्ती बळी पडले आहेत.
जसप्रीत बुमराहला ‘पॉली उम्रीगर’ पुरस्कार जाहीर
भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याला प्रतिष्ठेचा ‘पॉली उम्रीगर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज (रविवारी) ही घोषणा केली.
सन 2018-19 मधील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल बीसीसीआयने या पुरस्कारासाठी बुमराहची निवड केली आहे. बुमराहने 1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर 2019 या काळात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या 6 कसोटी सामन्यांमध्ये 34 विकेट घेतल्या. तर 17 वनडेत 31 विकेट आणि 7 टी-20 सामन्यात 8 विकेट घेतल्या होत्या. आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आणि वेस्ट इंडिज संघांविरुद्ध प्रत्येकी 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. कसोटी सामन्यांमध्ये बुमराहची मोठी कामगिरी होती, त्याच्या कामगिरीचा विचार करत त्याची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली. तर अन्य पुरस्कारांमध्ये चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल यांचाही गौरव केला जाणार आहे.