अफवांवर लगाम घालण्यासाठी फेसबुक कडून ‘गेट्स द फॅक्ट’ नावाचे फीचर लॉन्च
जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या अनेक अफवा सोशल मीडिया द्वारे पुढे येत आहेत. या अफवांवर आवर घालण्यासाठी फेसबुक ने पुढाकार घेत फेसबुकने ‘गेट्स द फॅक्ट’ नावांचे फीचर लॉन्च केले आहे. याची माहिती फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः दिली आहे.
मार्क झुकरबर्ग म्हणाले की, या फीचरमुळे खोटी माहिती आणि अफवा पसरवणं थांबवण्यास मदत मिळणार आहे. आम्ही मार्च महिन्यापासून या नव्या फीचरवर काम करत आहोत. आणि आता ते प्रत्यक्षात आणले आहे.
पुढे ते म्हणाले, आतापर्यंत आम्ही बारा देशांमध्ये 60 पेक्षा जास्त फॅक्ट चेक संस्थांबरोबर काम करून 50 भाषांमध्ये पसरणाऱ्या अफवा थांबवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच माहिती खरी आहे की खोटी हे कळण्यासाठी त्यावर आता लेबल ही लावले जाणार आहे. आता या नव्या फीचर मुळे खोट्या बातम्या पसरण्यावर लगाम बसणार आहे.
फेसबुकच्या ज्या युजर्सकडे आत्तापर्यंत खोटी माहिती पोहोचली आहे आम्ही त्यांना मेसेज द्वारे त्यासंदर्भातील खरी माहिती देणार आहोत असं ही त्यांनी यावेळी सांगितले.