अधिक मास मराठी माहिती – पुजा व्रत कथा माहात्म्य विधी । Adhik Mas Mahiti : अधिकमास किंवा ‘पुरुषोत्तम मास’ या मासात करावयाची व्रते अन् ती करण्यामागील शास्त्र जाणून घेऊया. अधिकमास म्हणजे पुण्यकारक कृत्ये करण्याचा काळ ! अधिकमासाला मलमास किंवा धोंड्याचा महिना असे म्हणतात. अधिकमासात मंगलकार्याऐवजी विशेष व्रते आणि पुण्यकारक कृत्ये केली जातात; म्हणून याला पुरुषोत्तम मास, असे म्हणतात.
अधिक मास मराठी माहिती – पुजा व्रत कथा माहात्म्य विधी । Adhik Mas Mahiti
अधिकमासात व्रते करण्यामागील शास्त्र
प्रत्येक मासात सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो; परंतु अधिकमासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करीत नाही. म्हणजेच अधिकमासात सूर्य संक्रात नसते. त्यामुळे चंद्र-सूर्याच्या गतीत फरक पडतो आणि वातावरणातही ग्रहणकालाप्रमाणे पालट होत असतात. या पालटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये; म्हणून या महिन्यात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करावीत, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे.
अधिकमास – या काळात पुढील व्रत तथा पुण्यकारी कृत्य करावे
अधिकमासात श्रीपुरुषोत्तमप्रीत्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित भोजन (अकस्मात एखाद्याच्या घरी भोजनासाठी जाणे), नक्तभोजन (दिवसा न जेवता केवळ रात्री पहिल्या प्रहरात एकदाच जेवणे) अथवा एकभुक्त (दिवसभरात एकदाच जेवावे) रहावे. अशक्त व्यक्तीने या चार प्रकारांपैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा. संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथी आणि व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा, असे शास्त्रात सांगितले आहे.
- या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा.
- प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. जेवतांना बोलू नये. त्यामुळे आत्मबळ वाढते. मौन भोजन केल्याने पापक्षालन होते.
- तीर्थस्नान करावे. किमान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते.
- दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
- तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे.
- तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते.
- गोपूजन करावे. गोग्रास घालावा.
- अपूपदान (अनारशांचे दान) करावे.‘
या संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथींना आणि व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा’, असे शास्त्रात सांगितले आहे.
अन्नदानाचे अधिकमासात महत्त्व !
‘अन्नदान करणे’, हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी प्रतिदिन अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे. ‘सद़्भावनेने ‘सत्पात्रे अन्नदान’ केल्यास अन्नदात्याला त्याचे उचित फळ मिळते, तसेच सर्व पातकांतून त्याचा उद्धार होऊन तो ईश्वराच्या जवळ जातो’, असे धर्मशास्त्र सांगते. अन्नदान केल्यास अन्नदात्याला आध्यात्मिक स्तरावरही लाभ होतो.
अधिकमास कथा मराठी
अधिक मासात संक्रांत नाही. तो काही ठरावीक ऋतूमध्ये येत नाही. त्या महिन्यात कोणतेही सणवार येत नाहीत. त्यामध्ये लग्नाचे किंवा अन्य मंगल प्रसंगांचे मुहूर्त काढले जात नाहीत. या तेराव्या महिन्याला स्वत:चे नाव आणि त्याला कोणतीही अधिष्ठात्री देवता नाही. बिचाऱ्या अधिक मासाला कोणी देवता नसल्यामुळे तो अशुभ ठरला. शुभ कार्यच काय, पितृकार्यदेखील या महिन्यात वर्ज्य मानले गेले. मग काय? सगळे जण त्याला मलमास किंवा मलीन मास म्हणून हिणवू लागले. अशी निंदा ऐकून अधिक मास फार दु:खी झाला. मग त्याने विष्णूची उपासना केली. त्याला विष्णू प्रसन्न झाले. त्याला विचारले, ‘तुला काय हवे आहे?’ अधिक मासाने आपले सगळे दु:ख विष्णूला सांगितले आणि म्हणाला, ‘देवा, मला कोणी देवता नाही. माझे रक्षण करणारा कोणी स्वामी नाही. माझी लाज राखणारी अधिष्ठात्री देवता नाही. त्यावर काही उपाय कर.’
कनवाळू विष्णूने त्याला स्वत:बरोबर गो-लोकात नेले. तिथे एका रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तम बसला होता. एखाद्या तेजस्वी ज्योतीप्रमाणे तो शोभून दिसत होता. ती दिव्यमूर्ती पाहून अधिक मास आनंदाने डोलू लागला. करुणासिंधू पुरुषोत्तमाने मलमासाची व्यथा जाणून त्याला वरदान दिले, ‘आजपासून तू माझा झालास. आता माझे सर्व दैवी गुण तुझ्यात लीन होतील. यापुढे तुला कोणीही मल मास म्हणणार नाही. तुला आता सगळे जण पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतील. या महिन्यात जे कोणी धर्माचरणाची पुण्यकर्मे करतील, त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल. त्यांची मनोरथे पूर्ण होतील आणि माझ्या कृपेने त्यांना मुक्ती मिळेल.’ मुरलीधराचे ते शब्द ऐकून पुरुषोत्तम मासाला अतिशय आनंद झाला. परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे, तसे पुरुषोत्तमाच्या दिव्य दर्शनाने अशुभ समजला जाणारा अधिक मास शुभ झाला.