सोळा सोमवारची कथा

Shweta K
By -
0

 सोळा सोमवारची कथा मराठी 

आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी शिव-पार्वती फिरता-फिरता त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली.

डाव कोणी जिंकला, असं पार्वतीनं गुरवाला विचारलं, तेव्हा त्यानं शंकराचं नाव सांगितलं. 

त्यामुळे पार्वतीला राग आला व ‘तू कोडी होशील,’ असा शाप दिला. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. 

पुढे एके दिवशी, त्या देवळामध्ये स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी त्या गुरवाला पाहिलं व त्याला कोडाचं कारण विचारलं. 

गुरवानं गिरिजेचा शाप सांगितला. 

अप्सरांनी त्याला सोळा सोमवारचं व्रत सांगितलं. त्यामुळे तू बरा होशील, असं सांगितलं. 

गुरवानी “ते व्रत कसं करावं.” असं विचारलं. 

अप्सरांनी सांगितलं, “सारा दिवस उपवास करावा. संध्याकाळी आंघोळ करावी. शंकराची पूजा करावी. नंतर अर्धा शेर कणीक घ्यावी, त्यात तूप-गूळ घालावं व ते खावं. त्या दिवशी मीठ खाऊ नये. त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे. सतराव्या सोमवारी पाच शेर कणीक घ्यावी. त्यात तूप गूळ घालून चुर्मा करावा. देवळात न्यावा. भक्तिभावानं शंकरांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर चुर्म्याचा नैवेद्य दाखवावा. पुढं त्याचे तीन भाग करावे. एक देवाला, दुसरा देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गायीला चारावा; तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं.” असं सांगून त्या नाहीशा झाल्या. 

पुढं गुरवानं हे व्रत केलं. गुरव चांगला झाला.

पुढं काही दिवसांनी शंकर-पार्वती पुन्हा त्या देवळात आली. 

पार्वतीनं गुरवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं विचारलं तेव्हा ‘आपण सोळा सोमवाराचं व्रत केलं; त्यामुळे हे घडलं.’ असं सांगितलं. 

पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिकस्वामी परत यावा, म्हणून हे व्रत केलं. कार्तिकस्वामी ताबडतोब येऊन भेटला. पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. 

कार्तिकस्वामीनं हे व्रत केलं. कार्तिकस्वामीला फार दिवस देशांतराला गेलेला मित्र भेटला. कार्तिक स्वामीनं हे व्रत ब्राह्मणाला सांगितलं. 

मित्रानं लग्नाचा हेतू मनात धरून मोठ्या श्रद्धेनं सोळा सोमवारचं व्रत केलं. त्याला त्या व्रताचं फळ मिळालं. राजाच्या हत्तीनं त्याच्या गळ्यात माळ घातली. त्यामुळे राजकन्येशी त्याचा विवाह झाला.

पुढं राजकन्येने त्याला विचारलं, “मी आपणास कोणत्या पुण्यानं प्राप्त झाले ?” त्याने तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. 

तिनं पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरून व्रत केलं. तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं, “मी कोणत्या पुण्यान तुला प्राप्त झालो ?” तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. 

त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरून ते व्रत कल. एका नगरात आला असता तेथील राजानं आपली मुलगी व राज्यही दिलं.

इतकं होत आहे, तो ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देवळात गेला. घरी बायकोला पाच शेर कणकीचा चुर्मा पाठवून दे, म्हणून निरोप दिला. 

राणीला आपला मोठेपणा लक्षात आला. चुर्म्याला लोक हसतील, म्हणून एका तबकात पाचशे रुपये भरून पाठवून दिले. चुर्मा वेळेवर आला नाही, व्रतभंग झाला; म्हणून देवीला राग आला. त्यानं राजाला दृष्टांत दिला. ‘राणीला घरात ठेवशील, तर राज्याला मुकशील, दारिद्र्यानं पीडशील.” ईश्वराचा दृष्टांत अमान्य केल्यास त्याची अवकृपा होईल, हे जाणून तिला नगरातून हाकलून दिलं.

पुढं ती दीन झाली. रस्त्यानं जात होती. एका नगरात म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला खाऊ-पिऊ घातलं. एके दिवशी तिला चिवटं विकायला बाजारात पाठवलं. वाऱ्यानं सारी चिवटं उडून गेली. तिनं म्हातारीला सांगितलं. म्हातारीनं अवलक्षणी म्हणून हाकलून दिलं. तिची जिथं दृष्टी जाईल, तिथं वाईट घडत असे.

एका गोसाव्याने तिची चौकशी केली. तिनं आपली सारी हकीगत सांगितली. धर्मकन्या मानून तिला घरी नेलं. पण तिथंही असंच अभद्र घडू लागलं. त्यानं तिला व्रत मोडल्याचं पाप आहे, हे जाणलं. 

शंकराची प्रार्थना केली. शंकर प्रसन्न झाले. सोळा सोमवाराचं व्रत करण्यास सांगितलं. पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवाराचं व्रत करविलं, तसा परमेश्व कोप नाहीसा झाला.

तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली. चोहीकडे दूत पाठवून शोध घेतला. गोसाव्याकडे आले. त्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रे वगैरे देऊन यथोचित सत्कार केला. गोसावी म्हणाला, “ही माझी धर्मकन्या. तिला माहेरी ठेवून घेतलं होतं. आपली पत्नी आपण घेऊन जा. सुखानं नांदा.” 

उभयतांनी गोसाव्याला नमस्कार केला. मोठ्या आनंदाने राणीसह नगरात आला. मोठा उत्सव केला. दान-दक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केलं.

राणीनं श्रद्धायुक्त अंत:करणाने मोठ्या भक्तिभावाने सोळा सोमवारांचे व्रत केले. राजा-राणीची भेट झाली. आनंदाने रामराज्य करू लागली. तसे आपण शंकराला प्रसन्न करून रामराज्य करूया. 

ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी, देवा-ब्राह्मणांचे द्वारी, गायीचे गोठीत, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)